राजाराम बंधारा पाण्याखाली; दोन्ही बाजूंची वाहतूक बंद
कोल्हापूर, दि. ४ : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा येथील पाणीपातळीत वाढ झाली असून, बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी १६.९ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.