घोडेगावच्या डॉक्टरांचे जागतिक संशोधन
व्हिटिलिगो उपचारात २८ वर्षांचे अभूतपूर्व यश
घोडेगाव (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील संशोधक डॉक्टर संजय धोंडीराम सोनवणे पाटील यांनी पांढरे डाग (व्हिटिलिगो) या आजारावरील संशोधनातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या विषयावरील तिसऱ्या संशोधन प्रबंधाचे नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले असून ग्रामीण महाराष्ट्रातून घडलेले हे संशोधन जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
१९९७ ते २०२५ या २८ वर्षांच्या कालावधीत डॉ. सोनवणे यांनी ७ हजारांहून अधिक व्हिटिलिगो रुग्णांवर उपचार करून मिळवलेले निष्कर्ष देशातील सर्वात मोठ्या अभ्यासांपैकी एक मानले जात आहेत. या संशोधनानुसार सुमारे ९० टक्के रुग्णांमध्ये अंशतः किंवा पूर्ण स्वरूपात त्वचेचा रंग परत आला, तर ९१ टक्के रुग्णांमध्ये नवीन डाग येणे थांबले. उपचारानंतर पुन्हा आजार बळावण्याचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी असून कोणतेही दुष्परिणाम आढळले नसल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. सोनवणे यांनी विकसित केलेल्या इम्युनोमोड्युलेशन-आधारित होमिओपॅथी उपचारपद्धतीमुळे त्वचेतील रंग निर्माण करणाऱ्या मेलेनोसाइट पेशींची नैसर्गिक पुनर्रचना सुरू होते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तीन ते सहा महिन्यांत रुग्णांमध्ये दिसणारी सुधारणा ही या उपचारपद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जात आहेत.
छोट्या घोडेगावात सुरू झालेले आनंद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर आज देशातील व्हिटिलिगो उपचारातील महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक ठरले आहे. दीर्घकालीन फॉलोअप, छायाचित्र नोंदी, रुग्णांचे मानसशास्त्रीय मूल्यमापन आणि शास्त्रीय विश्लेषणामुळे हे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानले जात आहे.
या अभ्यासात अनेक रुग्णांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल समोर आला आहे. लहान वयापासून पांढऱ्या डागांनी त्रस्त असलेल्या मुलांपासून सामाजिक बहिष्कार, नैराश्य आणि आत्मविश्वास गमावलेल्या महिलांपर्यंत अनेकांना नवसंजीवनी मिळाल्याचे उदाहरणे अभ्यासात नमूद आहेत.
या संशोधनाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच अमेरिकन मेरिट कौन्सिल एक्सलन्स अवॉर्डसारख्या आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. इंजेक्शन व रुग्णालयात दाखल न करता दिली जाणारी सुरक्षित व परवडणारी उपचारपद्धती ग्रामीण आरोग्यव्यवस्थेसाठी आदर्श ठरत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
व्हिटिलिगोसारख्या ऑटोइम्यून आजारांच्या उपचारासाठी डॉ. सोनवणे यांचे संशोधन एक नवी दिशा देणारे असून भविष्यातील वैद्यकीय अभ्यासासाठी महत्त्वाचा संदर्भ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


