चांदी महागल्याने मिठाईची चमक कमी
वर्खऐवजी सुका मेव्याचा वापर वाढला
चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीचा फटका आता मिठाई उद्योगालाही बसू लागला आहे. काजू कतली, बर्फीसारख्या पारंपरिक मिठाईंवर वापरला जाणारा खाण्यायोग्य चांदीचा वर्ख महाग झाल्याने अनेक मिठाई विक्रेत्यांनी त्याचा वापर कमी केला आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, वर्खच्या किमती यंदा दुप्पट झाल्या असून १५० पानांसाठी सुमारे १,४०० रुपये खर्च येत आहेत. परिणामी, मिठाई सजावटीसाठी पिस्ता, केशर व सुका मेवा यांसारखे पर्याय वापरले जात आहेत.
रक्षाबंधन ते लग्नसराई या कालावधीत वर्खची मागणी २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, १ जानेवारी २०२५ रोजी प्रतिकिलो ८६,००५ रुपये असलेली चांदी १६ डिसेंबर २०२५ रोजी १.९२ लाखांवर पोहोचली. अहमदाबादच्या जैनम सिल्व्हर प्रॉडक्ट्सचे एमडी अरिक जैन यांनी सांगितले की, चांदीच्या दरवाढीमुळे वर्ख महागल्याने मिठाई विक्रेते आता पर्यायी सजावटीकडे वळले आहेत.


