चाकणसाठी १,४०० कोटींचा आराखडा; हिंजवडी वाहतूक कोंडीसाठी ४२६ कोटींची योजना
चाकणसाठी १,४०० कोटींचा आराखडा; हिंजवडी वाहतूक कोंडीसाठी ४२६ कोटींची योजना
रस्ते, पावसाळी निचरा, वाहतूक व्यवस्थापन व नागरी सुविधांवर भर; डिसेंबरपासून कामे सुरू करण्याचे नियोजन
पुणे :
चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांच्या स्वतंत्र आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आराखड्यांचे सादरीकरण केले.
बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकणमधील पायाभूत सुविधा विकासासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते, पावसाळी निचरा, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांसाठी विविध विभागांच्या निधी व यंत्रणांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला आहे.
७५ किलोमीटर रस्त्यांची पहिल्या टप्प्यात सुधारणा
चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे ४९८ किलोमीटरच्या रस्ते जाळ्याचा अभ्यास करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. या कामांमध्ये पादचारी मार्ग, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतूक सुविधा आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. उपलब्ध रस्ते हक्काच्या जागेचा वापर करून ही कामे करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात भूसंपादनाची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जून २०२७ पर्यंत नाले मोकळे करण्याचे उद्दिष्ट
चाकण परिसरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांपैकी सुमारे ७० ते ८० टक्के अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित अडथळे टप्प्याटप्प्याने दूर करण्यात येणार आहेत. नैसर्गिक नाले मोकळे करून पाणी निचऱ्याची व्यवस्था जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे.
पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनावरही भर
चाकण औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा योजनेचे काम २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच १४ गावे आणि दोन नगर परिषदांमधील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून ही व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव असून, पुढील आठ ते दहा महिन्यांत ती कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
AI आणि CCTV आधारित वाहतूक नियंत्रण
चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक नियंत्रण तसेच नियमभंगावर कारवाई करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. CCTV आधारित इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) देखील प्रस्तावित आहे.
हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींचा स्वतंत्र आराखडा
हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, वाहतूक आणि अन्य व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दोन्ही भागांतील कामे डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून, चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्यांमध्ये पुढील पावसाळ्यापूर्वी सुधारणा करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.