चिपळूणच्या कृषी महोत्सवात भाजप खासदार नारायण राणेंना भोवळ; उष्णतेमुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज

0
50
चिपळूणच्या कृषी महोत्सवात भाजप खासदार नारायण राणेंना भोवळ; उष्णतेमुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज
चिपळूणच्या कृषी महोत्सवात भाजप खासदार नारायण राणेंना भोवळ; उष्णतेमुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज

चिपळूणच्या कृषी महोत्सवात भाजप खासदार नारायण राणेंना भोवळ; उष्णतेमुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज

सिंधुदुर्ग l चिपळूण

चिपळूण येथे आयोजित कृषी व पशुधन प्रदर्शन २०२६ च्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे खासदार नारायण राणे यांना अचानक भोवळ आल्याची घटना घडली. भाषण करत असतानाच राणे यांची तब्येत बिघडल्याने सभास्थळी काही काळ एकच खळबळ उडाली.
घटना घडताच त्यांच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ राणे यांना खुर्चीवर बसवले व पाणी दिले. यावेळी त्यांच्या पत्नी नीलम राणे स्टेजवर उपस्थित होत्या. काही मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
चिपळूण परिसरात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला असून तीव्र उन्हामुळे उष्णतेचा त्रास झाल्यानेच त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे सभागृहात काही काळ चिंता निर्माण झाली होती, मात्र राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कार्यक्रमावेळी भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, भास्कर दानवे आणि संतोष दानवे हेही मंचावर उपस्थित होते.
दरम्यान, नारायण राणे यांनी अलीकडेच सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही चिरंजीव आता राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे आपल्याला थांबायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. वय आणि शारीरिक मर्यादांचा उल्लेख करत त्यांनी राजकारणातून मोकळीक घेऊन व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
या पार्श्वभूमीवर राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन राजकारणातून मुक्त करण्याची विनंती केली होती. राज्यसभा किंवा लोकसभा नको असून आपला व्यवसाय करायचा आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र नड्डा यांनी ही विनंती फेटाळत, राणेजी, हम आपको छोड़नेवाले नहीं हैं, असे म्हणत त्यांना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here