सिंधुदुर्गमध्ये “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” आंदोलन
पालकमंत्री नितेश राणेंचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
सिंधुदुर्ग l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शाळा बंद न करण्याचा आणि 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाचा पुनरावलोकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” मंचाच्या वतीने शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा”, “आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका” आणि “आमची शाळा बंद करू नका” असे घोषणाबाजी केली आणि शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
या वेळी पालकमंत्री नितेश राणे सरळ आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मैदानात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्थिर भविष्य आणि गुणवत्ता शिक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पालकमंत्री म्हणाले की,’ सिंधुदुर्गमधील विद्यार्थी हे जिल्ह्याचे भविष्य आहेत आणि त्यांच्या शिक्षणावर कोणताही अन्याय केला जाऊ देणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की हा प्रश्न “तुम्ही विरुद्ध आम्ही” असा नाही, तर कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून वेगळे निकष लागू करण्याची गरज आहे.
नितेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले की कोकणसाठी स्वतंत्र निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांशी चर्चे करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर तातडीने संबंधित बैठका घेतल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की शासन मंत्रालय स्तरावर ठोस तोडगा काढून विद्यार्थ्यांचे भविष सुरक्षित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि केवळ शब्दांपुरता आश्वासन न देता कृतीतून निर्णय दिसेल, असा विश्वास त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.


