चिपळूण आयटीआयमध्ये निर्लेखित व भंगार साहित्याची विक्री; दरपत्रक सादर करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर
चिपळूण
भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), चिपळूण येथील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची तसेच भंगार साहित्याची दरपत्रक (निविदा) पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे.
इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने सादर करावीत, असे आवाहन प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
निविदेच्या बंद लिफाफ्यावर खरेदीदाराने आपले नाव व संपूर्ण पत्ता स्पष्ट अक्षरात नमूद करावा. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० नंतर आलेली दरपत्रके स्वीकारली जाणार नाहीत.
प्राप्त निविदा दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या ड्रॉईंग हॉलमध्ये निविदाकार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतील.
निविदा उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया दृकश्राव्य (व्हिडिओ रेकॉर्डिंग) पद्धतीने नोंदवली जाणार आहे. विक्री करावयाचे साहित्य सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष पाहता येईल.
महत्त्वाच्या अटी व शर्ती :
* कोरा नमुना अर्ज : निविदेचा कोरा अर्ज संस्थेतून ५० रुपये शुल्क भरून अथवा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (mumbai.dvet.gov.in/ratnagiri_institutes/iti_chiplun) डाऊनलोड करता येईल. विहित नमुन्यातीलच अर्ज स्वीकारले जातील.
साहित्याची उचल व भरपाई : सर्वोच्च दर सादर करणाऱ्या पात्र खरेदी दारास साहित्य मंजूर केले जाईल. दर मंजूर होताच संपूर्ण रक्कम संस्थेकडे जमा करून साहित्य स्वखर्चाने, आहे त्या स्थितीत कार्यालयीन वेळेत ताब्यात घ्यावे लागेल.
साहित्य नेताना संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई संबंधित खरेदीदारास करावी लागेल. भंगारातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही खरेदीदाराची राहील.
कालावधी व वजन : निविदेत नमूद केलेले दर पुढील तीन महिने (डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत) बंधनकारक राहतील. साहित्याचे वजन संस्थेच्या अथवा अचूकता तपासलेल्या वजनकाट्यावर प्राचार्यांच्या देखरेखीखाली केले जाईल.
इतर अटी : संस्थेतील कर्मचारी व त्यांचे नातेवाईक या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास अपात्र असतील. राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास निविदा रद्द केली जाईल. तसेच कोणतीही निविदा स्वीकारणे, नाकारणे अथवा विक्री रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालय प्रमुखांनी राखून ठेवले आहेत.


