छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध – उदय सामंत
छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध – उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, शेंद्रा औद्योगिक वसाहत (DMIC) येथे स्थानिक उद्योजक, शेतकरी आणि विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधला. यावेळी उद्योग क्षेत्राच्या विकासासह शेतकरी व उद्योजकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
संवादादरम्यान शेतकरी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी दिले.
यावेळी बोलताना, छत्रपती संभाजीनगर आणि परिसराला महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक हब म्हणून विकसित करण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून, उद्योगवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार विलास बापू भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. डी. मलिकनेर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी विनय गौडा, एमआयडीसीचे मुख्य अभियंता बनसोडे, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांच्यासह महावितरण, उद्योग विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, शेतकरी आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.