३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षा निकाल व श्रेयांक अपार आयडीशी संलग्न करा- विद्यापीठांना चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षा निकाल व श्रेयांक अपार आयडीशी संलग्न करा- विद्यापीठांना चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई :
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित, सुलभ आणि देशभरात सहज उपलब्ध व्हावीत, तसेच उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल, श्रेयांक (Credits), पदवी प्रमाणपत्रे आणि पदविका प्रमाणपत्रे तातडीने अपार आयडी (Apaar ID) आणि डिजी लॉकर (DigiLocker) पोर्टलवर अपलोड करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत ‘एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र’ या धोरणांतर्गत अपार आयडी आणि डिजी लॉकर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जून २०२६ पर्यंत झालेल्या राज्यातील सर्व परीक्षांचे निकाल आणि संबंधित विद्यार्थ्यांचे श्रेयांक ३१ जुलै २०२६ पर्यंत अपार आयडीशी संलग्न करून पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी सर्व विद्यापीठांना दिले.
याशिवाय, विद्यापीठांनी पदवीदान समारंभाची प्रतीक्षा न करता परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पदवी व पदविका प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तातडीने डिजी लॉकरवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची डिजिटल स्वरूपात सहज उपलब्धता मिळणार असून, देशातील कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच रोजगाराच्या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करणे अधिक सुलभ होणार आहे.