“जनशक्तीपुढे धनशक्ती हरलीच पाहिजे’
वैभववाडी l प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे सत्तेचा दुरुपयोग करत असून उमेदवारांना धमकावणे, पैशाचे आमिष दाखवून उमेदवारी मागे घ्यायला लावणे हा त्यांचा शेळपटपणा असल्याची जोरदार टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तरीही आमचे उमेदवार खंबीरपणे निवडणूक लढवत असून ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्तीच विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख नंदू शिंदे, गुलझार काझी, संतोष पाटील, संदीप सरवणकर आदी उपस्थित होते.
बिनविरोध निवडणूक हा नितेश राणेंचा करिष्मा नसून पैशाचा करिष्मा असल्याचा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला. दहा ते पन्नास लाख रुपयांपर्यंत बोली लावून उमेदवारी मागे घ्यायला लावली जात असल्याचे सांगत, आमच्या उमेदवारांनाही पैशाची ऑफर देण्यात आली होती मात्र त्यांनी ती नाकारली असेही ते म्हणाले


