‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ विषयावर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र
२ व ३ सप्टेंबरला जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्यावर विविधांगी विचारमंथन
नवी दिल्ली :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र २ आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या कार्यातील विविध पैलूंवर या चर्चासत्रात सखोल विचारमंथन केले जाणार आहे. महाराजांची प्रशासन व्यवस्था, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठा आरमार, संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ तसेच पुढील काळात मराठ्यांचा दिल्लीवरील प्रभाव या विषयांवर तज्ज्ञांकडून चर्चा करण्यात येणार आहे.
शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा आणि त्यांच्या प्रशासनाच्या दूरदृष्टीचा विविध अभ्यासकांच्या माध्यमातून मागोवा घेण्याचा प्रयत्न या चर्चासत्रातून केला जाणार आहे. इतिहासातील या विविध पैलूंवर राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, अभ्यासक आणि संशोधक आपले विचार मांडणार आहेत.
या चर्चासत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे व्यापक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय संदर्भ अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


