जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांत विलंब खपवणार नाही

0
22
जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांत विलंब खपवणार नाही
जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांत विलंब खपवणार नाही

जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांत विलंब खपवणार नाही

रत्नागिरी l प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संबंधित विभागांना इशारा दिला. ठरवून दिलेली मुदत पाळली गेली नाही तर विभागप्रमुखांची चौकशी केली जाईल, तसेच कामाच्या गुणवत्तेबाबतही स्वतंत्र तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी विभागनिहाय सादरीकरण करून निधीचा वापर, प्रलंबित कामे, आलेल्या मागण्या आणि दायित्व याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेत कामांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. दायित्वाची मागणी ०५ मार्च २०२६ पर्यंत सादर करावी, अन्यथा चौकशी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रशासकीय मान्यता देताना घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

करदात्यांचा पैसा योग्य आणि दर्जेदार कामांसाठीच वापरला गेला पाहिजे, यासाठी सर्व विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी. कामाच्या गुणवत्तेबाबत बाह्य संस्थेमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१५ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध निधीचा शंभर टक्के खर्च करावा आणि ज्या कामासाठी निधी दिला आहे ते काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here