जुन्या शिवसैनिकांचा १३ नोव्हेंबरला कणकवलीत स्नेहमेळावा
१३ नोव्हेंबरला कणकवली हुमरठ येथे जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा; संघर्षमय आठवणींना मिळणार उजाळा
माजी आमदार परशुराम उपरकर, नागेश मोर्ये यांच्यासह जुन्या सहकाऱ्यांचे १९८३ ते १९९० या काळातील शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी)
१९८३ मध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास, १९९० च्या दशकात अधिक व्यापक होत गेला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचे काम करणाऱ्या त्या काळातील जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सावली, हुमरठ येथे हा स्नेहमेळावा रंगणार आहे.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार घेऊन त्या काळात शिवसैनिकांनी गावोगावी, वाडीवस्त्यांवर जाऊन संघटनेचे काम केले. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, मोठ्या राजकीय नेतृत्वाची साथ नसताना अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशाला चाट देत, प्रसंगी उपाशीपोटी राहून पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रवासात विविध गावांतील असंख्य कार्यकर्ते एकत्र आले. जात-पात, भेदभाव आणि व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करत अनेक गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या. या कामाच्या निमित्ताने अनेकांशी मैत्री झाली, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि आयुष्यभर टिकणारे स्नेहबंध जुळले. तो काळ तारुण्याचा, उत्साहाचा, जिद्दीचा आणि संघर्षाचा होता.
आज अनेक वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. त्यावेळचे काही सहकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत आहेत, तर काही जण राजकीय क्षेत्रापासून दूर आहेत. मात्र, राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या तरी जुन्या मैत्रीचे बंध आणि संघर्षमय दिवसांच्या आठवणी आजही कायम आहेत. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुन्या मित्रांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला त्या काळातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख तसेच १९८३ ते १९९० या कालखंडातील सर्व आजी-माजी शिवसैनिक आणि सहकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे. प्रत्येकाने आपले अनुभव, आठवणी आणि संघर्षाचे किस्से मनमोकळेपणाने सांगावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी मैत्रीचा भगवा आजही मनात कायम! जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी, आठवणींची देवाणघेवाण आणि स्नेहपूर्ण गप्पांनी हा मेळावा अविस्मरणीय ठरणार आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर, नागेश मोर्ये, बाळा पाटकर, राजू राणे, बाळा राणे, रवि सावंत, चंदू हरियाण, बाळा शेट्ये आणि बबन कर्णिक यांनी या स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.