श्रमदानातून सडवे येथे साकारला ८० मीटरचा बंधारा; ५० ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग!
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा कृतीतून संदेश; लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श उपक्रम
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही गावाचा विकास साधता येतो, याचा प्रत्यय सडवे येथील ग्रामस्थांनी घडवून आणला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानातून तब्बल ८० मीटर लांबीचा बंधारा बांधला आहे. सुमारे ५० ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमातून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा व्हावा, भूजलपातळीत वाढ व्हावी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसाठा निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. गावाच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या कामासाठी ग्रामस्थांनी कोणताही संकोच न बाळगता उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
या उपक्रमात गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जयेंद्र कावणकर, सरपंच वसंत मेंगे, पोलीस पाटील रोशन पादड, ग्राम अध्यक्ष प्रकाश मेंगे, जितेंद्र मनवल, माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक पादड, ग्रामपंचायत सदस्य महेश वाळंज यांच्यासह सुमारे ५० युवक आणि ज्येष्ठ ग्रामस्थ सहभागी झाले होते.
युवकांचा उत्साह, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे बंधाऱ्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. या उपक्रमातून केवळ जलसंधारणाचे काम झाले नाही, तर गावाच्या सामूहिक विकासासाठी एकत्र येण्याची सकारात्मक भावना देखील अधोरेखित झाली.
शासनाच्या योजनांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसमृद्ध गावाची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते, हे सडवे ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गावाच्या हितासाठी एकजुटीने केलेले हे श्रमदान इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.


