ज्येष्ठ पत्रकार उत्तम (भास्कर) वाडकर यांचे निधन; पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ
अवघ्या १२ तासांत दोन सख्ख्या भावांचे निधन
सावंतवाडी, दि. २७ :
दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक कडेलोटचे संपादक, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच साप्ताहिक संघटनचे राष्ट्रीय नेते उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (वय ७२, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी) यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, त्यांचे धाकटे बंधू उदय वाडकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही तासांतच उत्तम वाडकर यांच्या निधनाची दुःखद बातमी सावंतवाडीत पसरली. त्यामुळे वाडकर कुटुंबावर अल्पावधीतच दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उत्तम वाडकर यांनी अनेक दशकांपासून पत्रकारितेत निष्ठेने कार्य केले. दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. साप्ताहिक कडेलोटचे संपादक म्हणूनही त्यांनी निर्भीड आणि अभ्यासपूर्ण लेखनातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
पत्रकारितेबरोबरच त्यांनी शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख म्हणून राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली. तसेच साप्ताहिक संघटनच्या राष्ट्रीय नेतृत्वात कार्यरत राहून संघटनात्मक कामातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू, निर्भीड आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. अनेक राजकीय, सामाजिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून वाडकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!


