झाडे जगली तर आपण जगू; कुंभवे शाळेत शंभर फळझाडांचे वाटप
झाडे जगली तर आपण जगू; कुंभवे शाळेत शंभर फळझाडांचे वाटप
‘मिशन आपुलकी’ व ‘एक पेड मां के नाम’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना फळझाडांची भेट; प्रभाकर शिंदे यांचे पर्यावरण संवर्धनाचे आवाहन
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
“सध्या विविध कारणांसाठी बेसुमार वृक्षतोड होत आहे. झाडे जगली तरच आपण जगू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे प्रतिपादन दापोली येथील अश्विनी ॲग्रो फार्मचे मालक प्रभाकर शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा, कुंभवे येथे आयोजित फळझाडे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कोकणातील अनेक शेतकरी शेती तसेच गुराढोरांकडे पाठ फिरवत असताना, शेती करणाऱ्या आणि फळझाडांची निगा राखणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक झाले पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
‘मिशन आपुलकी’ तसेच ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत अश्विनी ॲग्रो फार्मच्या वतीने कुंभवे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या आवारात लागवडीसाठी जांब, लिंबू, कोकम, जांभूळ, पेरू आणि चिकू यांसारख्या शंभर फळझाडांचे समारंभपूर्वक वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या आवारात कोकमच्या रोपाचे प्रात्यक्षिकासह रोपण करण्यात आले. फळझाडांची लागवड करताना खड्ड्याचा आकार, शेणखताचे प्रमाण, वाळवी प्रतिबंधक पावडर तसेच फॉस्फेटचा वापर किती आणि कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात कुंभवे शाळेतील विद्यार्थी कु. अर्णव विलास गोरीवले याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल कुणबी सेवा संघाच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घराच्या आवारात फळझाडे रुजविण्याचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यातील पिढीला निसर्गाशी जोडणारा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
फळझाडांसारख्या उपयुक्त रोपांचे वाटप करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची प्रत्यक्ष शिकवण दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश काष्टे यांनी अश्विनी ॲग्रो फार्मचे आभार मानले.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश काष्टे, डॉ. प्रमोद सावंत, कुणबी सेवा संघाचे शशिकांत कोकमकर, प्रभाकर तेरेकर, मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्यासह शिक्षक बाबू घाडीगांवकर, प्रतीक्षा झाडेकर, सुनंदा मळगे, पुनम चौधरी आदी उपस्थित होते.