राज्यात २०४ आश्रमशाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी.
राज्यातील २०४ आश्रमशाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
आदिवासी विकास विभागाचा ‘ॲनिमिया निवारण कार्यक्रम’; ‘सीएसीआर’सोबत सामंजस्य करार
मुंबई :
राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधील ॲनिमिया (रक्तक्षय) समस्या दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘ॲनिमिया निवारण कार्यक्रम’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०४ शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
तपासणी झालेल्या शाळांमध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांतील ५५,८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांतील २२,४२० आणि ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील १,३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये ३७,९१९ विद्यार्थी आणि ४१,७०५ विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली आहे.
सीएसीआरसोबत सामंजस्य करार
ॲनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (CACR) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात येत आहे.
विभागनिहाय पाहता नाशिक विभागात सर्वाधिक १०४ शाळांमधील ४१,४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे. ठाणे विभागातील ८१ शाळांमधील ३३,४२६ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
तसेच अमरावती विभागात २,८९८ आणि नागपूर विभागात १,८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळीची तपासणी करण्यात आली आहे.
कमी हिमोग्लोबिन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूरक आहार
तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यक पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखणे, ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.