झुंज खेळणाऱ्या गवा रेडयांची धडक बसल्यामुळे तुळस येथे झालेल्या अपघातात चौघेजण जखमी
वेंगुर्ले l प्रतिनिधी
झुंज खेळणाऱ्या गवा रेडयांची धडक बसल्यामुळे तुळस येथे झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले. यात ओमनी कारसह रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री घडली. लक्ष्मण रामा जाधव (वय ३१) रामा लक्ष्मण जाधव (वय ६५), रिक्षाचालक गोविंद रामचंद्र जाधव आणि धनश्री गोविंद जाधव असे जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून त्यांना तातडीची मदत देण्यात आली असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित भागात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले.


