ठाण्यातील भीषण पाणीटंचाई आणि वाहतूककोंडीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सभागृहात तीव्र शब्दांत टीका
नागपूर l
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नगरविकास, गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत माननीय विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरातील गंभीर पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर थेट शासनाचे लक्ष वेधले.
डॉ. आव्हाड म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्षे योग्य नियोजनच न केल्याने शहरातील एकाही विभागात पुरेसे पाणी उपलब्ध नाही. प्रत्येक विभाग ‘दुसऱ्यावर अवलंबून’ असल्याच्या मानसिकतेत सापडला आहे. घोडबंदर रोडवरील सोसायट्यांना पाण्याच्या टँकरसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत, तर मुंब्रा-कळव्यालाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शासनाने वारंवार आश्वासने दिली तरी प्रत्यक्षात पाण्याच्या टाक्याही उभ्या राहिलेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘शाई धरण’ प्रकल्पासाठी २०० कोटी मंजूर केले होते, मात्र राजकीय विरोधामुळे ही योजना थांबवण्यात आली. आज त्याची किंमत तब्बल २८०० कोटी रुपयांवर गेली असून, ठाणे शहर ‘पाण्यासाठी भीक मागण्याच्या’ स्थितीत पोहोचला असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘‘याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर भविष्यात पाण्यावरून हाणामाऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यातील वाहतूककोंडीवर कठोर शब्दांत हल्ला
घोडबंदर रोड, मुंब्रा-कळवा आणि संपूर्ण ठाण्यातील वाढत्या वाहतूककोंडीबाबत ते म्हणाले की, शहरातील विकासाचा वेग, वाढत्या इमारती आणि लोकसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता अत्यंत अपुरी आहे. मेट्रो आणि मोनो रेल्वे प्रकल्पांचे पिलर्स बांधताना MMRDA ने घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडच पळवले, ही गंभीर चूक असल्याचे आव्हाड यांनी निदर्शनास आणले. यामुळे गेल्या एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
मुंब्रा वाहतूककोंडी : कारणे आणि उपाय
मुंब्रा परिसरातील वाहतूककोंडीबाबत बोलताना त्यांनी हॉकर्सने अर्धा रस्ता व्यापल्याचे सांगितले. ‘‘त्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिल्यास समस्या सुटू शकते, मात्र ठाणे मनपा अधिकाऱ्यांना ‘हप्ते घेण्यातच’ रस असल्याने त्याकडे लक्ष देण्याची त्यांची तयारी नाही,’’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुंब्रा येथील ब्रिटिशकालीन पूल वाढवण्यासाठी रेल्वेने परवानगी दिली असली तरी मनपेकडे त्यासाठी निधीच नाही. कळव्यातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी कळव्यातून पटनीकडे जाणाऱ्या ब्रिजला देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती, मात्र ठाणे मनपा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
शेवटी, ‘‘इतरत्र खर्च करण्यासाठी पैसे आहेत, पण ठाण्याच्या मूलभूत गरजांसाठी नाहीत,’’ अशा शब्दांत त्यांनी शासन आणि ठाणे महापालिकेच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.


