मराठी व कोकणी उद्योजकांना व्यवसायासाठी व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या **‘मिशन कोकण साम्राज्य’**च्या वतीने ठाणे पश्चिम येथे ‘कोकणी बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे. ८ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चार दिवस हा महोत्सवी सोहळा रंगणार आहे.
या बाजारपेठेत कोकणातील तसेच स्थानिक उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. घरगुती पदार्थ, दागिने, साड्या, कपडे, हस्तकला, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने आदी विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
‘मिशन कोकण साम्राज्य’च्या माध्यमातून मराठी व कोकणी उद्योजकांना उभे करणे, नव्या उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन कामठे मैदान, घंटाळी नाका, सत्यम कलेक्शनसमोर, ठाणे पश्चिम येथे करण्यात आले आहे. बाजारपेठ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या कोकणी बाजारपेठेला आवर्जून भेट देऊन स्थानिक तसेच कोकणी उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक अजय आत्माराम यादव यांनी केले आहे.