डीन हटाव-हॉस्पिटल बचाव : शासकीय रुग्णालयाविरोधात जनआंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग, : जिल्हा वासियांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कथित गैरव्यवहारांचा कागदपत्रांसह पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी आज ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. पुणे, सांगली व कोल्हापूर येथील ठेकेदारांच्या माध्यमातून रुग्णालयाचा कारभार चालवला जात असून, कोटींच्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“एनी डेक्स” सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया नियंत्रित करून स्वतःलाच पात्र ठरवणे आणि इतरांना अपात्र ठरवणे, असा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप गावडे यांनी केला. काही महिन्यांपूर्वी ६२ लाखांच्या निविदेला डावलून ९९ लाखांच्या निविदेला मंजुरी देण्यात आल्याचा प्रकार त्यांनी पुराव्यासह उघड केला. याकडे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तत्कालीन अधिकाऱ्यांच्या पत्रांचा आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या खुलाशांचा दाखला देत, रुग्णालयातील भ्रष्टाचार कशा पद्धतीने चालतो याचा तपशीलही त्यांनी मांडला. वस्त्रधुलाई, साहित्य खरेदी, आहार पुरवठा, पुस्तक खरेदी अशा विविध विभागांमध्येही अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला.
रुग्णालयातील ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या डीनविरोधात तक्रारी असूनही कारवाई न झाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचे गावडे म्हणाले. डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने रुग्णांना इतरत्र रेफर करावे लागत असून, रुग्णालयावर ‘रेफर सेंटर’ असा शिक्का बसल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, रुग्णांच्या तक्रारी नसल्याचा डीनचा दावा धक्कादायक असल्याचे सांगत गावडे यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय आणि ढासळलेली आरोग्य सेवा लक्षात घेता, १ मेनंतर “डीन हटाव… हॉस्पिटल बचाव” या घोषणेखाली तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.


