१४ अनधिकृत वाळू वाहतूक गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त — जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

0
11
१४ अनधिकृत वाळू वाहतूक गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त — जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
१४ अनधिकृत वाळू वाहतूक गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त — जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

१४ अनधिकृत वाळू वाहतूक गाड्या जप्त; तोंडवलीतील रॅम्प उद्ध्वस्त — जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी रात्री मोठी धडक कारवाई करत १४ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेतल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट आदेशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तोंडवली येथील वाळू उपशाचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.

या कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः मध्यरात्री दोन वाजता झाराप येथील तपासणी नाक्यावर भेट देत कारवाईचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे महसूल यंत्रणा अधिक सक्रिय झाली होती. देवगड व दोडामार्ग वगळता इतर सहा तालुक्यांतील तहसीलदार या कारवाईत सहभागी झाले होते.

कुडाळ-मालवण परिसरातून सर्वाधिक ९ गाड्या जप्त करण्यात आल्या, तर वेंगुर्ला तालुक्यात ३ आणि वैभववाडी येथे २ गाड्यांवर कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण पट्टा अवैध वाळू वाहतुकीसाठी संवेदनशील मानला जात असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या बेदरकार वेगामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः आठवडा बाजाराच्या गर्दीत अपघाताचा धोका वाढला होता. काही दिवसांपूर्वीच कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या वाहनाला कारवाईदरम्यान अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलत ही मोहीम राबवली.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here