तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन
रायगड l प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील तळा येथे नागरी सेवा व सुविधा योजनेंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी त्यांनी प्रथम ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे दर्शन घेऊन राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
नवीन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा व सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यामुळे नगरपंचायतीच्या कामकाजाला गती मिळणार असून नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
याच कार्यक्रमात प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२४–२५ अंतर्गत मोदी तलावाच्या सुशोभिकरण कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच तळा परिसराच्या सर्वांगीण विकासाला यामुळे वेग मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तळा तालुक्याचा विकास, नागरिकांचा विश्वास आणि प्रगती या त्रिसूत्रीवर आधारित वाटचाल सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आज राज्यात महायुती सरकार जबाबदारीने काम करत असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तळा तालुक्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांची सुरुवात होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तळा प्रगतीच्या नव्या टप्प्यावर पाऊल टाकत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला भगिनींचा सन्मान आणि सहभाग हेच खऱ्या विकासाचे लक्षण असल्याचे नमूद करत त्यांनी CIIIT प्रकल्पाच्या माध्यमातून टाटा कंपनी आणि राज्य सरकारच्या सहकार्याने तरुणांना आधुनिक शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगाशी सुसंगत राहण्यासाठी राज्यातील तरुण सज्ज झाले पाहिजेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत प्रत्येक क्षेत्रात जगात अव्वल स्थानी राहावा, हीच सरकारची दिशा आणि ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


