दरे गावात शिंदे कुटुंबीयांचा पारंपरिक गणेशोत्सव उत्साहात
दरे गावात शिंदे कुटुंबीयांचा पारंपरिक गणेशोत्सव उत्साहात
सातारा :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी शिंदे कुटुंबीयांनी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. गणेशोत्सवानिमित्त शिंदे हे दरे गावात दाखल झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांसह गावातील पारंपरिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला.
यानिमित्ताने शिंदे कुटुंबीयांच्या दरे येथील घरात गौरीचेही वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घरात भजन, पारंपरिक जाखडी नृत्य आणि सामूहिक आरती असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामुळे घरातील वातावरण भक्तिमय झाले.
सामूहिक आरतीच्या वेळी कुटुंबातील सदस्यांसह उपस्थितांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या गणेशोत्सवामुळे दरे गावातील वातावरणातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे तसेच शिंदे कुटुंबातील अन्य सदस्य आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.