दापोलीत ‘स्वीप’ पथकाद्वारे मतदार जनजागृती
दापोली l l प्रतिनिधी
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ‘स्वीप मतदार जनजागृती कलापथक’ तयार करण्यात आलेले असून या पथकाच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य व गीतगायनांचे सादरीकरण करून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. ठिकठिकाणी या स्वीप कलापथकाच्या सादरीकरणाचे मतदारांकडून कौतुक करण्यात येत आहे.
दापोलीचे उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या प्रेरणेने तसेच दापोली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे तसेच गुलाबराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार जनजागृती कला पथकाची निर्मिती करण्यात आली असून या कलापथकातील बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, संजय मेहता, संतोषसकपाळ,नितीन गुहागरकर अस्मिता बालगुडे, स्मिता कदम, संजीवनी लाडे, वैजन देवघरकर हे शिक्षक पथनाट्य गीतगायनातून मतदार जनजागृती करीत आहेत. दापोली तालुक्यात ग्रामीण भागातील मतदारांमध्ये जनजागृती होत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.


