दापोली जि.प.शाळांमधील गुणवंत विद्यार्थी निघाले मुंबई अभ्यास दौर्यावर
व्हिजन दापोलीच्या सर्व उपक्रमांसाठी सदैव सहकार्य राहील सभापती-उन्मेष राजे
दापोली l प्रतिनिधी
पंचायत समिती दापोलीचा सन २०१८ पासून व्हिजन दापोली हा स्वप्नवत उपक्रम सुरु असून,याद्वारे जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सिध्द करण्याची एक पर्वलीच मिळाली असून,व्हिजन दापोलीच्या सर्व उपक्रमांसाठी भविष्यातही सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी मुंबई अभ्यास दौरा नियोजन सभेत दिली.
सन२०२४-२५ मध्ये झालेल्या इ.४थी vds परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमधून गुणवत्ताप्राप्त ५१ विद्यार्थी,तसेच ७ शिक्षक,केंद्रप्रमुख,मुख्य समिती सदस्य यांचा दि.२३ व २४ मार्च दोन दिवस अभ्यास दौरा होणार असून प्रामुख्याने राज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांच्यामुळे सदर दौर्यातील विद्यार्थी व शिक्षक यांना विधान भवन कार्यतालिका तसेच विज्ञान केंद्र,तारांगण,आर्ट गॅलरी पाहता येणार असून मंत्री महोदयांमुळे दौर्यातील विद्यार्थांना आनंदानुभव मिळण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचेही सभापती उन्मेष राजे यांनी पुढे सांगितले.
याच दौर्यात सहभागी असणार्या तब्बल ९ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून हा व्हिजन दापोलीचाच परिणाम असून,जाणीव जागृती हीच कुठल्याही यशाची पायरी असते,असे सांगत दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी एखादा उपक्रम दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रारंभ करणे आणि सदर उपक्रम का?आणि कशासाठी सुरु केला असावा याची जाणीव होणे ही त्या उपक्रमाला यशप्राप्ती मिळवून देत असते, असे मत व्यक्त करीत त्या ९ विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
प्रारंभी नवनिर्वाचित सभापती राजे,तसेच गटविकास अधिकारी यांचा शिक्षण विभागाचेवतीने गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांचे हस्ते यथोच्च सन्मान करण्यात आला.
तद्नंतर सचीव सुनिल कारखेले यांनी प्रास्ताविक करतांना व्हिजन दापोली उपक्रमांचा आढावा स्पष्ट केला.नंतर अभ्यास दौर्यासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या गणवेशाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी सभापती,गटविकास अधिकारी यांचेसह गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे,विस्तार अधिकारी बळीराम राठोड, व्हिजन अध्यक्ष धनंजय सिरसाट,केंद्रप्रमुख तांबे,जाधव,जुवेकर आदि.व्यासपीठावर तर ५१ विद्यार्थ्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि व्हिजन मुख्य समिती सदस्य समोर उपस्थित होते. सुत्रसंचालन शशिकांत बैकर यांनी केले.


