दापोली शिक्षक संघाच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने दापोली तालुक्यातील महिला शिक्षकांसाठी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित खेळ पैठणीचा या मनोरंजक व चित्तवेधक स्पर्धेत रेणुका मोर या विजेत्या ठरल्या.
दापोली शहरातील पद्मश्रद्धा सभागृहात आयोजित केलेल्या या समारंभात सुप्रसिद्ध वृत्त निवेदीका, नाट्य अभिनेत्री तसेच वास्तुशास्त्र विशारद असलेल्या मुंबई येथील रिद्धी पाटील यांनी ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुधाकर गायकवाड तसेच शिक्षकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या शुभांगी नावडकर यांचा दापोली शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित खेळ पैठणीचा स्पर्धेत अंतिम लढत कोमल पोकळे, सुवर्णा सोनवणे आणि रेणुका मोर यांच्यात झाली. अतिशय रोमांचक झालेल्या या स्पर्धेत मांदिवली शाळेतील शिक्षिका रेणुका मोर यांनी बाजी मारली. त्यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी दापोली तालुक्यातील बहुसंख्य शिक्षिका उपस्थित होत्या. हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला आघाडी प्रमुख अश्विनी मोरे, नम्रता चिंचघरकर, मधुरा सोमण, स्मिता तळदेवकर, माधुरी पवार, सुवर्णा सोनावणे, सुप्रिया साबळे, श्रद्धा कोंडविलकर, विद्या गुरव, शुभांगी नावडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.


