‘दिलखुलास’मध्ये डॉ. जॅसमिन यांची पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष मुलाखत
‘दिलखुलास’मध्ये डॉ. जॅसमिन यांची पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष मुलाखत
१२ आणि १४ सप्टेंबरला आकाशवाणीवरून प्रसारण; शाडू मातीच्या मूर्ती, निर्माल्य व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश
कोल्हापूर –
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा’ या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ‘डॉ. जॅसमिन’ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत शनिवार, १२ सप्टेंबर आणि सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक ‘वृषाली पाटील’ यांनी केले आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, उत्सवाचा आनंद आणि आस्था कायम ठेवतानाच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारणे आवश्यक आहे. यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिकचा वापर टाळणे, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन व योग्य व्यवस्थापन आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. जॅसमिन यांनी सांगितले.
तसेच जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतींचा अवलंब, कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर, गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम आणि पारंपरिक वाद्यांवर आधारित मिरवणुकांना प्रोत्साहन देण्याबाबतही या मुलाखतीत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनासोबतच नागरिक, युवक आणि गणेशोत्सव मंडळांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. उत्सवाचा उत्साह आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून करण्यात आले आहे.