MPSC विद्यार्थी प्रतिनिधींच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा
MPSC विद्यार्थी प्रतिनिधींच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा
पेपरफुटी, परीक्षा पारदर्शकता, उत्तरपत्रिका आणि तक्रार निवारणासह विविध मागण्यांवर महत्त्वाचे निर्णय; पुढील आठ दिवसांत कार्यवाहीला सुरुवात
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी कालबद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रणालीतील त्रुटी दूर करून परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम करणे हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
भरती परीक्षांमध्ये सर्वंकष सुधारणा करण्यासाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील विविध विभागांत जाऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांनी समितीसमोर आपल्या सूचना व समस्या खुलेपणाने मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
तसेच गट-ब आणि गट-क मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ संदर्भात चौकशी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या इतर तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणांचा तपास SIT मार्फत करण्याबाबतही चर्चा झाली.
माहितीच्या अधिकारांतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत MPSC कडे शिफारस करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ज्या इतर परीक्षांबाबत तक्रारी आहेत, त्यांची फेरतपासणी करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार तोपर्यंत संबंधित मुलाखती स्थगित ठेवण्यात येतील.
गुन्हे शाखेच्या तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची SIT मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजूरकर समितीच्या शिफारसींचीही पडताळणी करून योग्य शिफारसींची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत दोन्ही पायांना चिप लावण्यासह अन्य पर्यायांचा विचार करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी गुणांकनाचा एकसमान पॅटर्न ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योतीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
MPSCच्या मुलाखतींसाठी स्पष्ट गाईडलाईन्स निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच PMC आणि MMRDA परीक्षांबाबतही सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
MPSC अध्यक्ष किंवा सचिवांविरोधात ठोस पुरावे दिल्यास स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि कोणालाही वाचविण्याचा प्रश्न नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या सर्व बाबींवर कालबद्ध कार्यवाही करण्यात येणार असून पुढील आठ दिवसांत प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आगामी परीक्षा अधिकाधिक पारदर्शक आणि ‘फुलप्रूफ’ पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्ज केल्यानंतरच परीक्षा घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
दरम्यान, MPSCमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता हा मुख्य निकष राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.