दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
13
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

खाद्यपदार्थ, हस्तकला व वस्त्रदालनांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठरत आहेत आकर्षणाचे केंद्र

नवी दिल्ली :
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री गणरायाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक महाराष्ट्र सदनाला भेट देत असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच खाद्यपदार्थ, कला आणि प्रदर्शन-विक्री दालने नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी आणि उकडीचे मोदक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ‘कौशल्याला सलाम!’ या उपक्रमातून दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे दालन उभारण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा’ या उपक्रमातील पैठणी, माहेश्वरी आणि इरकल साड्यांच्या दालनांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबर रोजी जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या उपस्थितीत ‘मराठी चित्रपट गीते’ हा संगीत सोहळा झाला. २१ सप्टेंबर रोजी ‘पाक कलाकृती स्पर्धा’ तसेच साध्वी जेठवानी यांचा ‘भरतनाट्यम’ नृत्य कार्यक्रम होणार आहे.
२२ सप्टेंबर रोजी राजेंद्र क्षीरसागर प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम, २३ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे प्रमिला लोदगेकर प्रस्तुत ‘लावणी’ कार्यक्रम, तर २४ सप्टेंबर रोजी मोनिका कपूर प्रस्तुत ‘बॉली बीट्स’ हिंदी-मराठी गायन व नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यादिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत जुन्या महाराष्ट्र सदनातून झांज पथकासह श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, काही निवडक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. राजधानीतील महाराष्ट्रप्रेमी, गणेशभक्त आणि रसिकांनी महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाला भेट देण्याचे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here