दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
जुन्नर l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी येथे आयोजित मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, अभिनेते रितेश देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते
तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांपैकी काहीही शिल्लक राहिले नसते. अत्यंत प्रतिकूल काळात अनेक राजे-महाराजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारत असताना राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणि ‘रयतेचे राज्य’ स्थापनेचे महान ध्येय दिले.
अठरापगड जातींना एकत्र आणत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समता, सन्मान, न्याय आणि महिला सुरक्षा यांवर आधारित सर्वसमावेशक राज्यव्यवस्था उभी केली. करप्रणालीतील सुधारणा, जलव्यवस्थापन, वनसंवर्धन तसेच जलदुर्ग उभारणीद्वारे सागरी सुरक्षेला दिलेले महत्त्व हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळाली आहे. छत्रपतींच्या प्रेरणेने विकास आणि उन्नतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. इ.स. २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची चारशेवी जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्य पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या लेकींनी सादर केलेल्या पाळणा गीताने संपूर्ण परिसर शिवमय झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधिवत पूजा करण्यात आली तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘शिवनेरी भूषण’


