दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन
दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन
सिंधुदुर्ग :
दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित जागतिक नेत्रदान पंधरवड्याच्या कार्यक्रमात करण्यात आले.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २७ ऑगस्ट २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. धनंजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोतीफळे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांची सविस्तर माहिती देण्यात आली. आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला जग पाहण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नेत्रदान हे दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणणारे महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना नव्या आयुष्याची आणि उज्ज्वल भविष्याची आशा देण्यामध्ये नेत्रदानाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाबाबत जनजागृती करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नेत्रदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.