देवगडच्या जनता दरबारात १०२ तक्रारी; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

0
40
देवगडच्या जनता दरबारात १०२ तक्रारी; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश
देवगडच्या जनता दरबारात १०२ तक्रारी; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

देवगडच्या जनता दरबारात १०२ तक्रारी; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

एसटीच्या प्रश्नांसह रस्ते, वीजपुरवठा आणि स्मार्ट मीटरच्या समस्यांवर नागरिकांनी मांडल्या तक्रारी

देवगड : नागरिकांच्या विविध समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार देवगड पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी इंद्रप्रस्थ सभागृह, देवगड येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १०२ तक्रारी व सूचना नोंदविण्यात आल्या. यामध्ये ३५ लेखी निवेदने तर ६७ तोंडी तक्रारी व सूचनांचा समावेश आहे.

जनता दरबारामुळे नागरिकांना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

एसटीच्या समस्यांबाबत सर्वाधिक तक्रारी

जनता दरबारात राज्य परिवहन महामंडळाशी संबंधित सर्वाधिक ३४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ११ लेखी आणि २३ तोंडी तक्रारींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचे वेळापत्रक, नवीन बसफेऱ्या सुरू करणे तसेच महिलांसाठीच्या सवलतीच्या स्मार्ट कार्डच्या ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले

सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित ३१ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १३ लेखी आणि १८ तोंडी तक्रारी होत्या. तालुक्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे, रस्ते दुरुस्ती तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.

वीजपुरवठा, स्मार्ट मीटरच्या तक्रारी

महावितरणशी संबंधित २८ तक्रारी जनता दरबारात मांडण्यात आल्या. यामध्ये दोन लेखी आणि २६ तोंडी तक्रारींचा समावेश आहे. स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिले, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होणे यासह विविध समस्यांकडे नागरिकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
गणेशोत्सवाच्या काळात थकीत वीजबिलाच्या कारणावरून वीजजोडणी खंडित करू नये, अशी मागणीही नागरिकांनी केली.
याशिवाय पंचायत समिती स्तरावरील दोन लेखी तक्रारी, सरपंचांविरोधातील तक्रारींसह इतर दोन निवेदने, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा, बीएसएनएल आणि नगरपंचायतीशी संबंधित प्रत्येकी एक लेखी निवेदन प्राप्त झाले.

प्रश्न कागदावर न राहता प्रत्यक्ष निकाली निघावेत

जनता दरबाराला पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, भाई पारकर, देवगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, गट विकास अधिकारी निलेश जगताप, पालकमंत्री नितेश राणे यांचे ओएसडी मनोज भोगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन त्या संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून या तक्रारींचा नियमित पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘प्रश्न कागदावर न राहता प्रत्यक्ष निकाली निघाले पाहिजेत,’ असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले असल्याचे पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व १०२ तक्रारी व सूचनांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधून स्थानिक प्रश्नांच्या निराकरणाला गती देणाऱ्या या जनता दरबारामुळे तालुक्यातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here