देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेकडून आंबा खरेदी-विक्रीला प्रारंभ
देवगड : देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने आंबा खरेदी-विक्री हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. १५ मार्च २०२६) कट्टा गोडावून येथे करण्यात आला. या उपक्रमामुळे तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष डी. बी. बलवान, संचालक जयवंत लाड, अभिषेक गोगटे तसेच व्यवस्थापक संतोष पाटकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खरेदी-विक्री प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
हंगामाच्या सुरुवातीलाच संस्थेने आंबा खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट विक्रीसाठी आणण्याची सोय झाली आहे. त्यामुळे दलालांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊन उत्पादकांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रसंगी बागायतदार गोकुळ आंबेरकर, श्रीजीत मराठे, प्रकाश डामरी, दिगंबर तोडणकर, संदीप तेली, रामचंद्र सावंत, राजा भुजबळ यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमाचे बागायतदारांकडून स्वागत करण्यात आले असून हंगामात चांगली उलाढाल होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.


