देवरूख येथे निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) बाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिर

0
196
देवरूख येथे निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) बाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिर
देवरूख येथे निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) बाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिर

देवरूख येथे निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) बाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिर

देवरूख l प्रतिनिधी
वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) विशेष मोहिमेअंतर्गत २९ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख) येथे जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

निष्क्रिय ठेव रक्कम म्हणजे दहा वर्षांहून अधिक कालावधीसाठी वापरात नसलेल्या ठेवी असून, त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या Depositor Education and Awareness Fund (DEAF) मध्ये वर्ग केल्या जातात. योग्य कागदपत्रांच्या आधारे या ठेवी खातेदार किंवा त्यांच्या वारसदारांना परत मिळू शकतात, अशी माहिती या शिबिरात देण्यात आली.

या शिबिरात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रबंधक कु. बेनझिर शेख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बँक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक श्री. अंजनी कुमार सिंह आझाद यांनी निष्क्रिय ठेवी टाळण्यासाठी Re-KYC प्रक्रिया पूर्ण करणे व खात्यास नामनिर्देशन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. बँकिंग कायद्यातील अलीकडील सुधारणांनुसार एका खात्यासाठी चार व्यक्तींपर्यंत नामनिर्देशन करता येते, अशी माहिती देत नागरिकांनी कुटुंबातील प्रलंबित दाव्यांसाठी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरास २६० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी निष्क्रिय ठेव रक्कम प्राप्त झालेल्या विविध लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित बँकांमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये निष्क्रिय ठेवींबाबत जनजागरूकता वाढल्याचे दिसून आले.

या शिबिराचे यशस्वी आयोजन बँक ऑफ इंडिया, देवरूख शाखेच्या टीमने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दर्शन दत्ताराम कानसे यांनी केले. या कार्यक्रमात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आरडीसीसी बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक तसेच विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here