देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र बदलापूरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग

0
23
देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र बदलापूरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग
देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र बदलापूरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग

देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र बदलापूरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग

शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासी बागायतदारांसाठी ठरणार वरदान; डोणे गावातील जागेला कुलगुरूंची सकारात्मक पसंती

बदलापूर (प्रतिनिधी) : देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील डोणे गावातील प्रस्तावित जागेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला आहे. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या या जागेची पाहणी करून कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू Dr. Sanjay Bhave यांनी विद्यापीठाच्या निकषांनुसार ही जागा संशोधन केंद्रासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठाच्या सात सदस्यीय उच्चस्तरीय समितीनेही जागेची पाहणी करून सकारात्मक अहवाल सादर केला होता. कुलगुरूंच्या पुष्टीमुळे देशातील पहिले जांभूळ संशोधन केंद्र बदलापूर येथे उभारण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
या उपक्रमामागे आमदार Kisan Kathore यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जांभूळ परिसंवर्धन व समुदाय विकास ट्रस्टचे विश्वस्त Aditya Gole यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
जांभूळाच्या हजारो जाती अस्तित्वात असल्या तरी त्यांचे संवर्धन, सुधारित वाणांची निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनाचे काम अद्याप मर्यादित स्वरूपात आहे. प्रस्तावित संशोधन केंद्रातून जांभूळ संवर्धन, बीज बँक उभारणी, कलम तंत्रज्ञानाचा विकास, सुधारित वाणांची निर्मिती तसेच कमी उंचीची आणि वर्षातून दोनदा फळ देणारी जांभूळ प्रजाती विकसित करण्याचे संशोधन हाती घेतले जाणार आहे.
या केंद्रामुळे शेतकरी, आदिवासी बागायतदार आणि कृषी विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार आहे. प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, शहरी शेती आणि वनीकरण क्षेत्रातील नव्या संकल्पनांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, जांभूळ संशोधन केंद्रासोबत शहरी शेती व वनीकरण केंद्र आणि शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्याचाही विचार सुरू आहे. हे सर्व प्रकल्प एकत्रितपणे साकार झाल्यास बदलापूर परिसर एकात्मिक कृषी विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो.
पाहणी दौऱ्यावेळी बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा Ruchita Ghorpade, ठाणे जिल्हा कृषी अधिकारी, विद्यापीठाचे संचालक Bharat Waghmode, Dhananjay Gole यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
१९७२ पासून विस्तारीकरणाच्या संधी शोधणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठासाठी हा प्रकल्प एक नवा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीकाठची ही जागा भविष्यात शाश्वत कृषी, संशोधन, शिक्षण आणि समुदाय विकासाचे आदर्श केंद्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here