धार्मिक मिरवणुकांमध्ये फटाके, लेझर लाईट व मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिमवर बंदी; मंडळांना सुरक्षा ठेव बंधनकारक

0
13
धार्मिक मिरवणुकांमध्ये फटाके, लेझर लाईट व मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिमवर बंदी; मंडळांना सुरक्षा ठेव बंधनकारक
धार्मिक मिरवणुकांमध्ये फटाके, लेझर लाईट व मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिमवर बंदी; मंडळांना सुरक्षा ठेव बंधनकारक

धार्मिक मिरवणुकांमध्ये फटाके, लेझर लाईट व मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिमवर बंदी

मंडळांना सुरक्षा ठेव बंधनकारक

मुंबई :
धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार धार्मिक मिरवणुकांमध्ये सार्वजनिक रस्ते व ठिकाणी फटाके फोडण्यास तसेच लेझर लाईट, उच्च तीव्रतेचे प्रकाशझोत आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टिमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश धार्मिक सण व मिरवणुकांना धर्माचा भेद न करता लागू असल्याचे स्पष्ट केले. ध्वनीची पातळी तपासण्यासाठी आयोजकांना डेसिबल मोजणी यंत्र बसवणे आणि ते ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे, तसेच साउंड सिस्टिममध्ये अंतर्गत ध्वनी मर्यादक (साउंड लिमिटर) बसविल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच, परवानगी देताना मंडळे किंवा व्यक्तींनी किमान १ लाख रुपये सुरक्षा ठेव जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त होऊ शकते. मिरवणुकीत परवानगीचे फलक तसेच आयोजकांची नावे, पत्ते आणि संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित ध्वनियंत्रणा, उपकरणे किंवा साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आणि संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील अनुपालन सुनावणी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here