धावत्या लोकलमधून प्रवाशाने मारली उडी
वाशी lप्रतिनिधी
धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी खाडी परिसरात गुरुवार पाच फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी घडली. तरुण प्रवाशाने लोकलमधून वाशीच्या खाडीत उडी मारल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांना आरडाओरडा केला. खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव मच्छीमारांनी जीवाची बाजी लावून वाचवला.
हाती आलेल्या माहितीनुसार, लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने जात होती. या गाडीमध्ये भारत शिवराम फुळमाळी नावाचा तरुण होता. लोकल वाशीच्या खाडीवरून जात होती त्यावेळी तरुणाने वेगाने हालचाल केली आणि थेट वाशीच्या खाडीत उडी मारली. पण मच्छीमारांनी जीवाची बाजी लावून भारत शिवराम फुळमाळी याला वाचवले. भारतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समजलेले नाही.


