नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी; सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांचे अंतर बंधनकारक
नवीन गॅस जोडण्यांवर तात्पुरती बंदी; सिलेंडर बुकिंगसाठी दिवसांचे अंतर बंधनकारक
आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय; नियमित ग्राहकांचा पुरवठा मात्र सुरळीत
रत्नागिरी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत काही महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार नवीन गॅस जोडण्या देण्याची प्रक्रिया राज्यभरात तात्पुरती बंद करण्यात आली असून ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगदरम्यान ठराविक दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस कंपन्यांना शासनाकडून यासंदर्भातील स्पष्ट निर्देश देण्यात आले असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा तुटवडा जाणवू नये आणि उपलब्ध साठ्याचे संतुलित वितरण व्हावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
सध्या नवीन गॅस जोडणी प्रक्रिया पूर्णपणे स्थगित असली तरी नियमित ग्राहकांसाठी गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात नियमितपणे सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध होत असल्याने पुरवठा व्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
जिल्हा पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सींशी सातत्याने संपर्क ठेवून वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात असून पारदर्शक आणि प्रमाणशीर पुरवठ्यासाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.