नवी मुंबईत आरोग्य सुविधांचा विस्तार; वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण

0
22
नवी मुंबईत आरोग्य सुविधांचा विस्तार; वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण
नवी मुंबईत आरोग्य सुविधांचा विस्तार; वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण

नवी मुंबईत आरोग्य सुविधांचा विस्तार; वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण

नवी मुंबई-
नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, सेक्टर १०, वाशी येथे विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये एमआरआय सेंटर सुरू करणे, अत्याधुनिक मॉड्युलर मोर्चरी (शवागृह) कार्यान्वित करणे, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सीएसएसडी) सुरू करणे तसेच रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता दर्शविणारे डिजिटल डॅशबोर्ड कार्यान्वित करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय वाशी आणि ऐरोली येथे हृदयविकारावरील उपचारांसाठी कॅथलॅब केंद्रांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मिल्क बँक सुविधा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सेक्टर ८, सीबीडी बेलापूर येथील डायलेसिस सेंटर आणि सेक्टर २४, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचेही लोकार्पण करण्यात आले.
या नव्या सुविधांमुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि आरोग्य सेवा अधिक सुलभ व जलद गतीने उपलब्ध होणार आहेत. विशेषतः हृदयविकार, मूत्रपिंडविकार आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन आणि महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून या नव्या सुविधांमुळे नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here