नवी मुंबईत ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता; रबाळे येथे देशी वृक्षांच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नवी मुंबईत ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता; रबाळे येथे देशी वृक्षांच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता रबाळे येथील डोंगराळ भागात देशी वृक्षांच्या लागवडीद्वारे उत्साहात करण्यात आली. या पर्यावरणपूरक उपक्रमात विविध वयोगटांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रसंगी नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सदस्या रंजना सोनवणे, नगरसेवक तथा माजी महापौर सुधाकर सोनवणे, वृक्षप्राधिकरणाचे सदस्य ज्ञानेश्वर नाईक व विनोद म्हात्रे, माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
उपमहापौर दशरथ भगत यांनी महिनाभर राबविण्यात आलेले सेवा संकल्प अभियान संपले असले, तरी सेवाकार्य निरंतर सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक दायित्व जपत पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी या परिसरात पाच हजारांहून अधिक वृक्ष लावून त्यांचे संगोपन केल्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
वन विभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल वळवी यांनी या परिसरात झालेल्या परिवर्तनाचे कौतुक केले. लोकसहभागातून वनीकरणाचे काम उभे राहणे, हे कृतीतून परिवर्तन घडवून आणण्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुधाकर सोनवणे यांनी २००५ पासून या परिसरात सुरू असलेल्या वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या प्रवासाविषयी समाधान व्यक्त केले. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे वाढते संकट लक्षात घेता पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने ती स्वतःची जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध विभागांनी सेवाभावी उपक्रम राबविले. या उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, उद्यान विभाग, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि इतर घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याशिवाय मॅजिक बस, विश्व बाल केंद्र, स्त्री मुक्ती संघटना, परिसर सखी, अहोमा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यवर्धिनी या सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला. विविध संस्थांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली.
सेवा संकल्प अभियानाची सांगता झाली असली, तरी सामाजिक सेवाभाव जपणे, नवी मुंबईत हिरवाई वाढविणे आणि निसर्ग संवर्धनाची चळवळ अखंड सुरू ठेवणे, असा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.