नवी मुंबई प्रभाग २३ ब मध्ये राजकीय खळबळ
नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र. २३ब मध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून, नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने थेट तात्पुरती स्थगिती दिली आहे. या आदेशामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पतीच्या कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी पराभूत उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात न्यायालयाने रुपाली भगत यांना १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोणतेही अधिकृत कामकाज करण्यास मज्जाव केला आहे.
न्यायालयाने स्पष्ट आदेश देत सांगितले आहे की, पुढील सुनावणी होईपर्यंत आणि आवश्यक स्पष्टीकरण सादर होईपर्यंत रुपाली भगत स्वतःला नगरसेवक म्हणून सादरही करू शकणार नाहीत. या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, ही स्थगिती कायमस्वरूपी का करू नये, याबाबत उत्तर मागवण्यात आले आहे.
या निर्णयामुळे प्रभाग २३ब मधील सत्तास्थिती डळमळीत झाली असून, स्थानिक राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामाशी संबंधित प्रकरणे असलेल्या इतरही नगरसेवकांवर कारवाईची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी काळात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या न्यायालयीन आदेशामुळे महापालिकेतील इतर लोकप्रतिनिधींमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


