१२ फेब्रुवारीपासून ३५० कनिष्ठ पर्यवेक्षकांची तैनाती
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, स्वच्छता मार्शलना निवृत्त करून त्यांच्या जागी प्रशिक्षित आणि जबाबदार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. कचरा रस्त्यावर टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच कचरा वर्गीकरण न करणे या बाबींवर कठोर कारवाई करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ पासून ३५० कनिष्ठ पर्यवेक्षकांची विशेष टीम तैनात करण्यात येणार आहे.
बीएमसीकडून नियुक्त करण्यात आलेले हे कनिष्ठ पर्यवेक्षक सुस्पष्ट नियमावलीनुसार कार्य करतील. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यातआले असून, अधिकृत दंड आकारणीची स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. मनमानी कारवाई किंवा नागरिकांशी वाद टाळण्यासाठी प्रत्येक पर्यवेक्षकास ओळखपत्र, ठरावीक अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या नव्या व्यवस्थेमुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होईल, असा विश्वास बीएमसी प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती वाढवून ‘स्वच्छ मुंबई’च्या उद्दिष्टाकडे एक पाऊल पुढे आले आहे.
या कारवाईसोबतच बीएमसीकडून नागरिकांसाठी मार्गदर्शन व जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. घरगुती व सार्वजनिक ठिकाणी ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, स्वच्छतेचे नियम आणि दंडाची माहिती फलक, सोशल मिडिया व स्थानिक कार्यक्रमांद्वारे दिली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करतानाच नियम पाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात येणार असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यामुळे शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून अनधिकृत कचरा टाकण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. नवीन यंत्रणेमुळे कारवाई अधिक पारदर्शक व प्रभावी होईल, असा विश्वास बीएमसी प्रशासनाने व्यक्त केला आह