नाशिक महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवक ‘अज्ञातस्थळी’ रवाना
बहुमत असूनही भाजप सतर्क!
नाशिकl प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणु -कीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकारण चांगलेच तापले असून, बहुमत असूनही भाजपला सतर्कतेची भूमिका घ्यावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दि. ५ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपने नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऐनवेळी पक्षांतर्गत नाराजी अथवा फुटीचा फटका बसू नये, यासाठी गुरुवारी सकाळी भाजपच्या सर्व ७२ नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले. यानंतर कोणतीही गळती होऊ नये याची खबरदारी घेत त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले. हा निर्णय अचानक घेण्यात आल्याने महापालिकेच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही अशी खबरदारी घ्यावी लागत असल्याने अंतर्गत मतभेद शिगेला पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. काही नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी, गटबाजी तसेच नेतृत्वाबाबतचे मतभेद यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.
“सत्ता निश्चित असतानाही ही धास्ती का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असून, “अंतर्गत नाराजीचा फटका बसणार का?” याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विरोधी पक्षांनीही या घडामोडींकडे लक्ष केंद्रीत करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपकडून ही नेहमीची संघटनात्मक प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत असले तरी, नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याचा निर्णय नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देणारा ठरत आहे. महापौर निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, पुढील काही तासांत नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवण्याची ही रणनीती यापूर्वीही राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांदरम्यान वापरण्यात आली आहे. मात्र नाशिकसारख्या ठिकाणी, जिथे भाजपकडे संख्याबळ स्पष्ट आहे, तेथे अशी खबरदारी घ्यावी लागणे हे पक्षांतर्गत अस्वस्थतेचे द्योतक मानले जात आहे.