नवी मुंबई महापालिका निवडणूक दोन दिवसांत 1,608 नामनिर्देशनपत्रांचे वितरण

0
345
मान्सूनपूर्व नालेसफाईतील त्रुटींवर बीएमसीची कारवाई; कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड
मान्सूनपूर्व नालेसफाईतील त्रुटींवर बीएमसीची कारवाई; कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड

नवी मुंबई महापालिका निवडणूक

दोन दिवसांत 1,608 नामनिर्देशनपत्रांचे वितरण; एकही अर्ज दाखल नाही

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत एकूण 1,608 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले असले तरी अद्याप एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गुरुवार 25 डिसेंबर आणि रविवार 28 डिसेंबर या सार्वजनिक सुट्ट्या वगळता नामनिर्देशनपत्र वितरणाची प्रक्रिया 29 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तसेच 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहील.

निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवारांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी अद्ययावत नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रांचे नमुने, तसेच विशेष माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुस्तिकेत उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज, निवडणूक व मतदान प्रतिनिधी नेमणूक नमुने, मतपत्रिकेवरील नाव छापण्याचा नमुना, पक्षीय जोडपत्रे (जोडपत्र 1 व 2), आदर्श आचारसंहिता, अर्हता–अनर्हता, प्रभागनिहाय आरक्षण, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते, तसेच प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेशांचा समावेश आहे. रु.100 दराने ही माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

23 डिसेंबर रोजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून 1,005 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले, तर 24 डिसेंबर 2025 रोजी 603 नामनिर्देशनपत्रे वितरित झाली. विभागनिहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे— बेलापूर 52, नेरुळ 102, वाशी 90, तुर्भे 96, कोपरखैरणे 111, घणसोली 75, ऐरोली 47 आणि दिघा 30.

दरम्यान, 25 डिसेंबर रोजी पूर्वघोषित सार्वजनिक सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्र वितरण व दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here