नवी मुंबई महापौर चषक श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६; सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी लाखोंची पारितोषिके
नवी मुंबई महापौर चषक श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६; सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी लाखोंची पारितोषिके
पर्यावरणपूरक, स्वच्छताप्रधान आणि समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सवाला प्रोत्साहन; एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा पारितोषिक निधी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक, स्वच्छताप्रधान, आरोग्यदायी आणि समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच नागरिकांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
नवी मुंबई शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रात देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि जनजागृती केली जाते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाचा उपयोग स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जलसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त उत्सव, जलसंवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक संदेश आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे घरगुती गणेशोत्सवामध्येही पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या परीक्षक समितीकडून उत्सवस्थळी भेट देऊन परीक्षण केले जाणार आहे. तसेच संबंधित मंडळांकडून व्हिडिओग्राफी आणि पूरक कागदपत्रे घेऊन त्याआधारे स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
🏆 स्पर्धेतील पारितोषिके
१. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार
🥇 प्रथम – ₹७०,००० 🥈 द्वितीय – ₹३०,००० 🥉 तृतीय – ₹२५,०००
२. उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार – ५ दिवस
🥇 प्रथम – ₹१०,००० 🥈 द्वितीय – ₹८,००० 🥉 तृतीय – ₹६,०००
३. उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव पुरस्कार – १० दिवस
🥇 प्रथम – ₹१०,००० 🥈 द्वितीय – ₹८,००० 🥉 तृतीय – ₹६,०००
४. उत्कृष्ट पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार
🥇 प्रथम – ₹४५,००० 🥈 द्वितीय – ₹३०,००० 🥉 तृतीय – ₹२५,०००
५. उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती पुरस्कार – ₹२२,०००५. ६. उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती पुरस्कार – ₹२२,००० ७. उत्कृष्ट सजावट पुरस्कार – ₹२२,००० ८. उत्कृष्ट पारंपरिक गणेशोत्सव पुरस्कार – ₹२२,००० ९. उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना पुरस्कार – ₹२२,००० १०. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार – ₹२२,००० ११. उत्कृष्ट सामाजिक संदेश पुरस्कार – ₹२२,०००
सर्व वैयक्तिक श्रेणीतील विजेत्यांना रोख पारितोषिकासोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ₹४ लाख २७ हजार रुपयांचा पारितोषिक निधी ठेवण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धेत नवी मुंबईतील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच घरगुती श्रीगणेश प्रतिष्ठापना करणाऱ्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.