महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक; परिवहन मंत्री व मुख्य सचिवांना पत्र
मुंबई :
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासातील सवलतीचा लाभ देताना NCMC कार्डची सक्ती करण्यात आल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधील प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, NCMC कार्डच्या सक्तीमुळे निर्माण झालेला गोंधळ अधिकच गंभीर झाला आहे. त्यामुळे NCMC कार्डची सक्ती तात्काळ रद्द करून प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा केली होती. मात्र, आता याच सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने सरकारच्या निर्णयातील विसंगती समोर येत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असणे, NCMC कार्डांचा तुटवडा, कार्ड रिचार्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच अपुरी व्यवस्था यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक प्रवाशांना सवलत मिळत नसल्याने पूर्ण तिकीटाचे पैसे मोजावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांना एसटी प्रवासात सवलत देण्याचा निर्णय घेताना NCMC कार्डची सक्ती करण्याची आवश्यकता नेमकी काय आहे, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. लाभार्थी महिला प्रत्यक्ष बसमध्ये उपस्थित असताना केवळ तांत्रिक किंवा कागदी प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे तिला सवलतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. तसेच, अशा प्रकारच्या अडचणींमुळे शासनाच्या सवलत योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी NCMC कार्डची सक्ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात परिवहन मंत्री तसेच मुख्य सचिव यांना पत्र देण्यात आले असून, NCMC कार्ड सक्तीचा निर्णय तातडीने रद्द करावा आणि प्रवाशांना सवलतीचा सुरळीत लाभ मिळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.