BVG व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा – संजीव गणेश नाईक
नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी पुढाकार; BVG व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा – संजीव गणेश नाईक
नवी मुंबई :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आपल्या जमिनींचे योगदान देणाऱ्या भूमिपुत्रांना विमानतळावर रोजगाराच्या न्याय्य संधी मिळाव्यात, तसेच त्यांना नियमानुसार वेतन, कामगार सुरक्षा आणि आवश्यक कायदेशीर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून BVG कंपनीच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक प्राथमिक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे, कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि प्रलंबित प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करणे, याबाबत भूमिका मांडण्यात आली. विमानतळाच्या उभारणीसाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान राखून त्यांना रोजगाराच्या योग्य संधी मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कामगारांना नियमानुसार वेतन, विविध लाभ, सुरक्षित कामाचे वातावरण आणि कायदेशीर तरतुदींनुसार आवश्यक सुविधा मिळाव्यात, यावर चर्चेदरम्यान भर देण्यात आला. तसेच, कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कंपनीच्या स्थानिक कार्यालयाने तातडीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करावी, असे आवाहन व्यवस्थापनाला करण्यात आले.
भूमिपुत्रांचे योगदान, कामगारांच्या हक्कांचा सन्मान आणि स्थानिकांना रोजगाराच्या न्याय्य संधी उपलब्ध करून देणे, या उद्दिष्टांसाठी कामगारांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार संजीव गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
या बैठकीला एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे युनिट जनरल सेक्रेटरी साधूराम मालुसरे, उपाध्यक्ष सुनील कटेकर, रंजीत म्हात्रे, सुनील म्हात्रे, गोवर्धन डाउर, सुहास म्हात्रे, मयूर भोईर, जनार्दन पाटील, संतोष पवार आणि पुंडलिक म्हात्रे यांच्यासह युनियन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.