रूटी तलाव कोरडा पडल्याने मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना मदतीचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

0
4
रूटी तलाव कोरडा पडल्याने मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना मदतीचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
रूटी तलाव कोरडा पडल्याने मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना मदतीचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

रूटी तलाव कोरडा पडल्याने मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना मदतीचे मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीड :
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या रूटी तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून मंत्री नितेश राणे यांनी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. यंदा पावसाअभावी रूटी जलाशय पूर्णतः कोरडा पडल्याने मत्स्योत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून, मच्छीमार बांधवांसमोर उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे.

रूटी जलाशयात अपेक्षित मत्स्योत्पादनाच्या तुलनेत गतवर्षी ६२ टक्के उत्पादन झाले होते. मात्र, यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मत्स्योत्पादन शून्य टक्क्यांवर आले आहे. जलाशयातील संगोपन करण्यात आलेले मत्स्यबीजही नष्ट झाल्याने मत्स्यव्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
या कठीण परिस्थितीत मच्छीमार बांधवांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी दिला.
जलाशयातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सीएसआर निधीची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.
मच्छीमार बांधवांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, महायुती सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्थानिक आमदार सुरेश धस, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, संबंधित अधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here