नाशिकला पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
9
नाशिकला पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिकला पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकला पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यापीठांनी स्टार्टअपसाठी सक्षम इनक्युबेशन सेंटर उभारावे

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी सक्षम इनक्युबेशन सेंटरची परिसंस्था निर्माण करावी. विद्यापीठांमधून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. आगामी काळात रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवी देण्याऐवजी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे कौशल्याधारित शिक्षण देणे आवश्यक आहे.
नाशिक उपकेंद्राने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक आणि रोजगारक्षम विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये विविध क्षेत्रांत मोठ्या संधी

नाशिकच्या विकासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासह द्राक्ष उत्पादन व निर्यात, अन्नप्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे सांगितले.
गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध उत्पादन व औद्योगिक क्षेत्रांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकच्या विविध क्षमतांचा विकास करण्यासाठी गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे शहर पुन्हा वेगाने विकसित होत आहे.
“पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून नाशिक उदयास येईल,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीला चालना

नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत नाशिकच्या विकासाला उपकेंद्र नवी दिशा देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक उपकेंद्राने तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here